Friday, December 14, 2007

३ : पुन्हा रमा..

करत नसलेल्या इस्त्रीचा चटका बसल्या सारखी रमा खाडकन भानावर आली. क्षणभर आपण समुद्रात हेलकावणार्‍या जहाजच्या डेकवर उभ्या आहोत, आपल्या अंगावर सामंतांच्या उज्ज्वलासारखी पांढरी शुभ्र साडी आहे आणि आपण तिच्यासारख्याच हिरव्या लाल डोळ्यांनी वादळात उसळणार्‍या लाटांकडे पहातोय असं काहीतरी भानावर येताना तिला वाटलं.

इतकं रंगून गेलो आपण त्या दोघांच्या बोलण्यात?

दोघे? ?

तिने समोरच्या सोफ़्याकडे पाहिले.

तो रिकामा.
त्यावरचे आत्ता बसलेले आणि बोलत असणारे ते दोघे गेले कुठे?

इषा आणि ठर्र की अथर्व अशा काहीतरी नावाचे?
आणि तो समुद्रावर घोंघावणार्‍या वादळासारखा वार्‍याचा आवाज? ह्याच खिडकीतून येत होता ना?

रमा आता पुरती चक्रावली.

लिव्हिंग रुम सन्नाट्यात बुडाल्यासारखी शांत होती.

नाही.

सन्नाटा नाही. वेव्हलेन्ग्थ हरवलेल्या रेडिओची अस्पष्ट खरखर आणि बाहेर खरंच पडत असलेल्या जोरदार पावसाचा आवाज.

पण बाकी सगळा सन्नाटाच.

होती कोण पण ती दोघं?
आणि आपली गोष्ट कां सांगत होते ते एकमेकांना? त्यांना कसं माहीत फ़रहान बद्दल?

स्वप्न होत?

पण मग आपण त्यांच्या स्वप्नात होतो की ते आपल्या?

काय वियर्ड विचार!
उद्याचं टेन्शन पाईल अप झालय मनात. बाकी काही नाही.
तिने मान झटकून आत स्वयंपाकघराच्या दिशेने पाहिलं. आईची काहीच चाहूल नव्हती.
नुसताच अंधार आतही.
जेवणं झाली सगळ्यांची? सगळे कोण? बाबा तर आलेच नव्हते मगाशी.

मगाशी?

ती परत दचकली. म्हणजे ते दोघं इथं होते तेव्हां.

"दिल दा मामला है दिलबर..." सन्नाट्यात सुसाटत उमटलेल्या गाण्यांच्या ओळींनी रमा मगाशी न बसलेल्या चटक्यानी जेव्हढी दचकली नव्हती तितकी दचकली.

फ़रहान!
ही असली फ़िल्मी रिन्गटोन त्यानेच सिलेक्ट करुन ठेवलीय आपल्या सेलफोनची.

टेबलावरचा सेलफोन उचलून कानाला लावता लावता रमा तिसर्‍यांदा दचकली.
हा झटका मात्र विलक्षण होता. सेलवरचं क्लॉक वेळ दाखवत होतं. 02:30 AM .

ओ माय गॉड!! दहा ते अडीच.

मधल्या वेळेचा एव्हढा मोठा तुकडा कुठे पडला?
झोपलो तर नक्कीच नव्हतो आपण. सोफ़्यासमोरच्या त्या भिंतीशी साडेदहा वाजता उभ्या होतो आपण हे जितकं स्पष्ट आठवतय तितकंच आत्ता त्या वादळाचा आवाज ऐकून भानावर आलो होतो तेव्हाही तिथेच होतो हे आठवतय. आणि उभ्या उभ्या झोपलो नक्कीच नव्हतो.

बधीरल्या अवस्थेतच तिने फोन कानाशी लावला.

"सॉरी रमा. झोपेतून उठवलं नां? अगं पण तासाभरापूर्वी ट्राय केला होता तर नो नेटवर्क.
मग ड्रायव्हिंग करत होतो. जस्ट पोचलो.
हॅलो.. हॅलो.. ऐकत आहेस कां की अजून झोपेत आहेस? "

फ़रहान ला कळेना ही जागी आहे की झोपेतच सेल ऑन केलाय?

"रमा? .. रमा?"
" हं? हो बोल. ऐकतेय.
कधी नव्हतं म्हणालास नेटवर्क?"
"अगं रात्री अकरा पासून ट्राय करतोय. मग शेवटी केला तो एकच्या सुमारास. लॅन्ड लाईनही कोणी उचलत न्व्हतं. होतात कुठे सगळे?"

सगळे?

"ते दोघं नाहीयेत आता." रमा नकळत अजून त्या सोफ़्यावरच्या मगासच्या दोघांमधेच लटकत राहिलेली.
" दोघे? कोण दोघे? " अजून नक्की झोपेत आहे ही.
"ते दोघे. अथर्व आणि इषा. "
"कोण हे? बरं ते जाऊदेत. तुला कॉल केला तो उद्या किती वाजता निघणार आहेस विचारायला. "

"तु येणारेस नां? एअरपोर्टवर? "
"सॉरी रमा. तुला माहितेय तुझ्या आई बाबांना नाही आवडणार माझं येणं. कशाला उगीच?"
" फ़रहान .. प्लीज. आता पुढचे सहा महिने भेटणार नाही आपण. "
"मग आत्ता भेटुयात ना. "
"आत्ता? वेड लागलय कां? वाजलेत किती? आणि तु रहातोस किती लांब!"
"रमा देवी .. गॅलरीत या जरा. कार खालतीच आहे माझी. "

what?? खरच की काय? फ़रहान आणि त्याची फ़िल्मी गिमिक्स!

रमा गॅलरीत न जाता डायरेक्ट बाहेरच जावं म्हणून दरवाजाकडे धावली.

दरवाजा उघडला आणि ती चौथ्यांदा दचकली.

हा धक्का मात्र जबरदस्त होता. बाहेर ...

2 comments:

सर्किट said...

जबरी.. :-))

मला वाटलं आता खऱ्या गोखले मॅडम कथेतल्या गोखलेंचं आडनाव बदलून, फ़रहानला पिटाळून लावतात की काय? ;-)

पण अथर्व आणि इषा हे सूत्रधारच गायब केलेस फ़क्त; बाकी सूत्र पुढे चालू. गुड वर्क.

सूत्रधार चांगले होतेच, पण इतके ताकदीचे सूत्रधार जर मधूनमधून पडद्यामागे ढकलले नाहीत तर कथेतली महत्त्वाची ’खरी’ पात्रे कशी डेव्हलप होणार?

बाठेसाहेब काढतील सूत्रधारांना पुन्हा बाहेर.. तोवर खेलते रहेंगे STY - हमलोग!

Monsieur K said...

kyaa baat hai!
u followed it up really well. aani suspense pan sahi thevla aahes end la. pudhe koni, kaay lihila aahe hyaachi utsuktaa aahe :)