"वटवट म्हणते सोट्या पूस!
इथे नाहीतर तिथे घूस!!"
"ठर्र - ही वटवट कोण?"
"तू!"
"आणि हा सोट्या?"
"मी"
"आयला! आता नक्की काय पुसणार आहेस तु?"
"कप्पाळ!"
"का रे बाबा - विधवा वगैरे झालास कि काय?"
"अगं आई गं - ईषावास्यमिदं, कुठे शिकलीस गं मराठी....? पाय कुठेत तुझे? दे, दे, मी धरतो!"
"कमॉन ठर् - सॉरी....अथर्व. एवढं वैतागायला काय झालं?"
"दॅट्स बेटर. आणि वैतागु नको तर काय ईषा? हे काय रमा बिमा लावुन ठेवलंयस?"
"अरे पण आपणच ठरवलं ना? एकत्र बसुन गोष्ट लिहायची...."
"नाटक म्हटलेलं मी!"
"गोष्ट!"
"नाटक!"
"गोष्ट!!"
"गोष्ट असो वा नाटक - ही काय सुरुवात झाली?"
"का? काय झालं?"
"व्हिजुअलाईज कर ना जरा - रात्री नऊ ची वेळ."
"नऊ नंतरची म्हणायचंय मला."
"चल - नऊ नंतरची म्हणूयात - दहा चालेल?
तर - रात्री दहाची वेळ.
बाहेर पाऊस.
अशा वेळेस टी. व्ही. - आणि चवीला जेवण-खाण - सोडुन मन न रमणारं नक्की काय करतेय ही बया?"
"आय डोन्ट नो....ड्रेसला इस्त्री?"
"हा! ड्रेसला इस्त्री!! लॉजिकल आहे!
तर रेडिओ मिरची ऐकत ही रमा ड्रेसला इस्त्री करतिए.
आणि तिच्या आईची भुणभुण चाललिए"
"जेवुन घे, जेवुन घे - अशी."
"तेच तर म्हणतोय मी - यात घडुन घडुन काय नाट्य घडणार?"
"गोष्ट!"
"बर बाई - गोष्ट!
पण आता तूच सांग ना - यात घडुन घडुन काय गोष्ट घडणार?"
"का? काहिही घडु शकतं!"
"काहिही घडु शकत नाही - कारण आईची भुणभुण ऐकुन घेणारी रमा, रेडिओ मिरची - ते पण रात्री दहा नंतर ऐकणारी रमा, ड्रेसला इस्त्री करणारी रमा म्हणजे एक पिक्चर डोळ्यासमोर उभं रहातं."
"पण मी बाहेर पाऊस पण पाडतिए ना!"
"तो आपला उगीचच. म्हणजे....म्हणजे उगीचच. त्याचा वातावरणाशी काहीच संबंध नाही. अशा वातावरणात रमेचे वडील लोकलमध्ये रमी खेळुन आणि ऑफिसात पाट्या टाकुन हाश-हुश करत -"
"आणि छत्री दाराबाहेर झटकत"
"सही! तर छत्री दाराबाहेर झटकत घरी येणार."
"पण रात्री दहानंतर म्हणजे उशीर नाही का?"
"तसा उशीरच, पण म्हातारा पिणारा वाटत नाही. आय मीन माझ्या व्हिजुअलायझेशन मध्ये तरी वाटत नाही."
"म्हातारा काय म्हणुन?"
"बाई - पोरगी इस्त्री करायच्या वयाची झाली कि बाप म्हातारा होतो!"
"बर!! हे कुठे शिकलात?"
"ते सोड, पण हे असं टिपिकल मध्यमवर्गीय वातावरण घेतलं कि काय डोंबलाचं फंडामेंटल लिहून होणार आपल्या हातुन?"
"ठर्र - तु असा पेटलास कि फार क्यूट दिसतोस!"
"वास्यमिदं - हे काय नविन?"
"नविन कुठे?"
"आय मीन नविन काही नाही म्हणुनच सांगतोय - उगीच पटवायचा प्रयत्न करु नकोस."
"का?"
"कारण मी काही तुझ्या प्रेमात वगैरे पडणार नाहिये."
"का?"
"का म्हणजे काय? आईने ठरवलेल्या मुलीशीच लग्न करायचं असं मी पुर्वीच ठरवलंय. आपल्याला उगीच लफडी नाही करायची."
"ठर्र - जरा इकडे ये ना."
"का?"
"मुस्काड फोडायचंय तुझं."
"का?"
"आयला - जगायचं म्हटलं तर आईचं बोट सोडवत नाही आणि लिहायचं म्हटलं तर फंडामेंटलच्या गप्पा?"
"ते सोड."
"काय सोडु?"
"ही स्टार्ट सोड."
"नाही सुटणार - अभ्याने रूल घातलाय - मागच्याची री ओढुन पुढे लिहायचं."
"री आणि मी? मी ओढलेली री विश्वस्पंदनाची!"
"ठर्र - जरा इकडे ये ना."
"भा.पो."
"काय?"
"मुस्काड ना?"
"नाही."
"मग?"
"आपण तुझ्या कानाखाली विश्वस्पंदनाची री ओढुयात."
"त्यापेक्षा आपण असं करुयात - आय मीन.....आयडिया!
मला ऍक्चुअली रमा ही कन्सेप्टच आवडली नव्हती. मी तिला खपवायचा वगैरे पण विचार केला पण...."
"म्हणजे डायरेक्ट गेम?"
"च्यायला वास्यमिदं - तुला हे शब्द कसे माहिती?"
"पण एका शामळु मध्यवर्गीय मुलीला मारायची सुपारी तरी कोण घेणार?"
"तेच तर! म्हणुन मग ’रमाको मारो’ वर्क नाही होत.
एक काम कर."
"बोल."
"पाऊस बंद कर."
"केला."
"खिडकी उघड. रात्रीचा दिवस कर."
"केला.
बाहेरचे आवाज वगैरे?"
"फुल टु डॉल्बी डिजिटल मध्ये येऊ दे."
"आणि बाबा?"
"बाबांना घरातच ठेव."
"कुठे ठेऊ?"
"घरातच - पण हॉल मध्ये. क्रिकेटची मॅच बघत."
"ट्वेन्टी ट्वेन्टी?"
"नाही - टेस्ट मॅच. बाबा दर्दी आहेत. रविवारी दुपारी मटण बिटण खाऊन निवांत -"
"आई गं - नॉन-व्हेज?"
"बाबांचं आडनाव काय?"
"आडनाव....लेले?"
"लेले.... मग रमा ले ले - होईल.
नको."
"मग?"
"गोखले करुयात."
"पण नॉन व्हेज वगैरे....?"
"गोखले ना? चालतं हल्ली."
"आई?"
"अरेच्चा, आई पण गोखले नाही का? आई फक्त रस्सा खाते म्हणु."
"ते नाही - आई कुठेय?"
"कुणाची?"
"डोंबल! रमाची! आणखी कुणाची?"
"ओह - आई....झोपलिए - आतल्या खोलीत."
"यु मीन बेडरुम?"
"बेडरुम रमासाठी - गोखले काका काकुंसाठी ती आतली खोली."
"ठीक. आता?"
"आता....रमाला बोअर झालंय."
"ते सगळ्यांनाच होतं. नविन काय?"
"ऐक ना - आपण फंडामेंटल लिहु. म्हणजे....रमा यडछाप वगैरे नाही. आय मीन हुशार. भलतीच हुशार. आय मीन ऑबसीन हुशार वगैरे नाही, पण ’य हुशार’. आणि समंजस. आणि संकोच सांभाळुन बिनधास्त असलेली."
"तुझं या शेवटच्या वाक्याशी एवढं ऑबसेशन का?"
"धर्माधिकारींची कविता होती तशी."
"बर ते जाऊदे.
रमा बद्दल सांगत होतास."
"तर रमा - रमा गोखले. आई वडिलांचा नेटाचा संसार, गुणी मुलगी, गुणी मुलगा, रमा इंजिनियर, मुलगा इंजिनियर. दोन खोल्यांच्या घरातुन चार खोल्यांच्या घरात. सपक वाटावं इतकं नेटाचं आयुष्य."
"कहानीमें ट्विस्ट किधर मग?"
"ट्विस्ट - फरहान."
"अख्तर?"
"नाही - खान."
"पुढे?"
"पुढे काय? तेच तर शोधायचंय."
"म्हणजे?"
"म्हणजे हे बघ. ड्रामा म्हणजे काय? आय नो - आपण गोष्ट लिहितोय, नाटक नाही. पण चूर्ण मधल्या चू ची चुरस कधी? तर दोन्ही बाजु समतोल असतील तर."
"मला अजुनही कळत नाहिए."
"म्हणजे हे बघ - गोखल्यांच्या घरातली रमा खानांच्या घरातल्या फरहानशी लग्न करायचं म्हणते, तेव्हा काय होईल?"
"वाऱ्याचा आवाज चालु करु का? डॉल्बी डिजिटल मध्ये?"
"हा हा! इतक्यात नको!! आणि इथे वाऱ्याचा आवाज नाही, वादळाची सैरभैर लागेल. शांत, स्तब्ध, आणि क्षुब्ध वादळाची सैरभैर."
"ठर्र - तुला एक सांगु का?"
"आय नो - मी क्युट आहे!"
"ते नाही - मला अजुनही कळलं नाहिए कि तुला काय म्हणायचंय ते."
"मला असं म्हणायचंय कि....
वेट अ मिनिट - तुला काय वाटतं - या परिस्थितीत काय होईल?"
"हे बघ - गोखल्यांच्या, आय मीन जगातल्या कुठल्याही गोखल्यांच्या घरातली मुलगी एकतर असं करणार नाही, ते पण एवढी शिकली सवरलेली, समंजस, खंबीर वगैरे मुलगी."
"प्रश्न तो नाहिए. आय मीन प्रेमात पडेल कि नाही हा. ते पडणं वगैरे ऑलरेडी झालंय. पुढे काय?"
"पुढे....मला वाटतं लिमिटेड ऑप्शन्स आहेत. एकतर रमा आणि शोएब समंजसपणे -"
"शोएब नाही गं - फरहान. ते पण खान."
"सॉरी ’अख्तर नाही’ हे एवढं डोक्यात बसलं कि अख्तर नाही म्हणजे शोएब तरी असेल असं वाटत रहातं.
तर - ते दोघं समंजसपणे आपापल्या वाटा धरतील. नाहीतर पळुन जातील, नाहीतर आत्महत्या करतील. वेल, एवढी शिकली सवरलेली पोरं म्हणजे असं नाही करणार - पण किसका क्या भरोसा....
ओह बाय द वे - हा शो - सॉरी फरहान काय शिकलाय?"
"इंजिनियर आहे. रमा बरोबर जॉब करतो."
"हं....बाकी स्वभाव वगैरे?"
"काय माहित - पण रमा सारख्या स्टेबल मुलीला आवडलाय म्हणजे आवडण्यासारखा असावा...."
"त्याच्या घरचे?"
"काय माहित?"
"बरं....तुला काय वाटतं?"
"तुझ्या शक्यता मला पटतात, आय मीन पटु नयेत, पण पटतात. आय मीन ’महापुरे झाडे जाती....’ या मराठी वृत्तीने विचार केला तर पटतात, पण आपण लव्हाळ्यांबद्दल लिहिणार असु तर मला तरी इंटरेस्ट नाही."
"मग तुला महापुरात वाचणाऱ्या झाडांबद्दल लिहायचंय कि काय?"
"नाही."
"मग?"
"महापुराला भिडणाऱ्या झाडांबद्दल."
"अथर्व - तु असं काही बोलायला लागलास कि तुला अथर्व म्हणावंसं वाटतं."
"वासु - पकवु नकोस."
"नाही पकवत नाहिए, पण या महापुरात तुला रमा आणि फरहान ही झाडं वाटतात का?"
"मी पण तोच विचार करत होतो - ती दोघं मला झाडं वाटतात का? हो आणि नाही. हो यासाठी कि ती अधली मधली आहेत. बोंबिलवाल्या इस्याच्या भुरकीनी अंडेवाल्या ईस्माइलशी लगीन लावलं तर गाजावाजा होत नाही. अजहरने संगीताशी निकाह केला तर सेना पेटत नाही. पण रमा आणि फरहान....त्या दृष्टीने झाडं. कधी ती झाडं वाटतही नाहीत कारण या महापुराला जबाबदार तीच. मग झाडं कशी?"
"मला वेगळंच म्हणायचंय - गोखले दांपत्य तुला झाडं वाटत नाहीत का?"
"ती वाकली कि मोडली कि तरली कि भिडली - यावर ते अवलंबुन आहे."
"पण लिहिणारा तर तूच, मग -"
"नाही. आपण. लिहिणारे आपण. मराठी नक्की किती खोल बघायचंय का तुला? मग वाचत रहा.
आणि गोखलेच कशाला - खान दांपत्य कितीक वेगळं असेल?"
"मग नक्की महापूर कोणता, आणि झाडं कोणती, आणि नक्की कोण कुणाला कुठं भिडणारे?"
"अगं सावकाश, सावकाश - रिअल लाईफ मध्ये गोष्टी इतक्यापण तडकाफडकी होत नाहीत. कोण कधी कुठं कसं आणि का वागलं हे शोधायला आपल्याला मागे जाऊन बरंच पुढे जावं लागेल. वाकणारी आणि मोडणारी झाडं असतील तर संघर्ष उरत नाही. संघर्ष नाही तर नाट्य नाही आणि नाट्य नाही तर तुझी गोष्ट पण नाही."
"मग आता?"
"आता वाट बघ."
"वादळाची?"
"या वादळाची एक गंमत सांगतो. सामंतांनी सांगितलेली. म्हणजे असं कि समुद्रावर वादळ लपुन छपुन येत नाही. असं छाताडावर येतं. समोरुन येतं. येतंय सांगुन येतं, आणि ते येतंय हे माहिती असुनही, तुम्ही त्याचं खेळणं होता."
"मग हे वादळ समुद्रावर येणार आहे कि जमिनीवर?"
"तीच तर गंमत आहे - हे वादळ आलंय.
कुठल्याही साऊंड इफेक्ट शिवाय बेडरुममध्ये बोर होत पडलंय.
पडेल, बाहेर पडेल. तूर्तास, आपण वाट बघुयात."
Thursday, December 13, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
amazing start!!
am wondering how tulip is going to follow up with this!
"gokhale"-bai, ab baazi tumhaare haath mein hai :D
क्या बात है! :)) सहीच!!
संवाद तर असले झालेत की नव्याकोऱ्या मराठी नाटकाचं करकरीत स्क्रिप्ट वाचायला मिळतंय असं वाटलं.
पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉललाच सिक्सर.
ह्याचा ड्राफ़्ट बघायच्या आधीच त्याच्या पुढचं पोस्ट लिहिण्यासाठी जागा रिझर्व केली गेली तेव्हाच जबरदस्त टेन्शन आलं. नंतरच पोस्ट काय झेपणार आणि कोण वाचणार:)) पण आता काय विलाज नाय.
कसली जबरी शैली आहे तुझी संवाद लिहिण्याची!! टोट्टली अनमॅच्ड. अथर्व आणि ईषा ला हात लावायची आपली नाही बाबा हिंमत. ते तुच ने पुढे.:))
Post a Comment