Sunday, December 16, 2007

८ : तगमग!

गाडीतलं वातावरण नि:शब्द होतं.. दोघांचेही डोळे व्याकूळ होते.. काहीतरी बोलायचं होतं, सांगायचं होतं, पण शब्द हातात सापडत नव्हते.. एक हळवी शांतता पसरली होती..

इतक्यात..

रमाच्या मोबाईलवर सतार झंकारली. खाडकन दोघंही भानावर आले..

घरून फोन होता. गडबडीनेच रमानी फोन घेतला, बाबा होते फोनवर..
"अगं रमा, आहेस कुठे तू? बरी आहेस ना?"

रमाला अपराधीच वाटलं खूप. पहाटेचे चार वाजले होते. मगाशी फरहान आला या आनंदात ती तशीच घराबाहेर पडली होती. एक चिठ्ठीही नव्हती ठेवली. बाबांना चिंता वाटणं सहाजिक होतं..
"हां, हो बाबा, मी ठीक आहे.."

"अगं आहेस कुठे तू? अशी न सांगता सवरता गेलीस कुठे अचानक? हिला जाग आली.. पहाते तर तू घरी नाहीस.. काय समजायचं आम्ही अश्यावेळी?" बाबांच्या मनातल्या चिंतेची जागा आता रागानी घेतली..

"काही नाही बाबा, मी नीट आहे. अशीच फरहानबरोबर लॉंग ड्राईव्हला आलेय.. येतेच मी अर्ध्या तासात.."

फरहान! बाबांच्या कपाळावरची शीरच तडकली. उद्या ही मुलगी परदेशी निघाली आणि अश्या वेळीही हिला घरी रहावसं वाटत नाही? कोण कसला तो फरहान? त्याला ना नोकरी, ना धंदा.. बापाच्या पैश्यावर सगळी ऐट. आणि ही या वेळी त्याच्याबरोबर???

त्यांना इतका राग आला की फोनवर ते काही बोलूच शकले नाहीत. ’लवकर ये’ इतकंच म्हणून त्यांनी फोन कट केला.

रमानी मोठा निश्वास सोडला. फरहानला फोनवरच्या बोलण्याचा अंदाज आला. तोही तसाच गप्प बसून राहिला.

रमाला जाणवलं.. ’ती’ वेळ गेली होती.. ती मंतरलेली वेळ.. कदाचित त्यात बरंच काही घडूनही गेलं असतं.. जे आत्तापर्यंत अव्यक्त होतं, जे मनाच्या एका कप्प्यात दडलेलं होतं.. ते कदाचित बाहेर आलं असतं.. पण!! गेली होती ती वेळ..

फरहाननी रमाकडे पाहिलं. मनकवडा होताच तो आणि रमाच्या मनातलं तर त्याला तिच्याकडे न बघताही कळायचं. कसंबसं ओठाच्या कोपर्‍यात एक छोटं हसू आणून तो म्हणाला,
"चल, घरी जाऊया?"

रमानी खूप कृतज्ञतेनी पाहिलं त्याच्याकडे. फरहान! कसं कळतं तुला सगळं!! आय विल मिस यू सो मच!

ते परत फिरले. परत येताना फरहाननी मुद्दाम कॉलेजमधल्या आठवणी छेडल्या. ते जुने दिवस आठवत आठवत ते घरी कधी पोचले समजलंही नाही. तोवर दोघांचाही मूड हलका झाला होता, मनातली खळबळ थोडीतरी शांत झाली होती.

घर आलं. रमा कारमधून उतरणार इतक्यात अचानक फरहाननी तिचा हात धरला. तिच्या डोळ्यात पाहून तो म्हणाला,
"रमा, टेक केअर. लवकर परत ये.."

’आपण जातोच का आहोत’ असे काहीसे विचार रमाच्या मनात यायच्या आधीच त्याने झटक्यात तिचा हात सोडलाही.. मिष्किलपणे म्हणाला,

"माझ्याकडे बघत बसू नकोस.. जा आता.. बाबा वाट पहातायेत.. मी फोन करीन.. बाय.."
-------------------------------------------------------------------------------

टळटळीत दुपार पसरली होती.. फरहान तळमळत होता.. ’काय सालं नशीब आहे? तो फोन तेव्हाच यायचा होता? श्या! आज कदाचित रमाच्या दिलकी बात आली असती बाहेर.. काय माहौल होता.. पहाटेची वेळ, मोकळा रस्ता, नवी कार आणि रमा! खुदा!! मेरा सपना मेरे कितने पास था.. पण शेवटी हाती काहीच आलं नाही.. श्या!!’

वैतागून त्याने उशी जोरात फेकली..

आणि अचानक बसलेल्या त्या तडाख्यानी शमा जोरात ओरडली..

"ऊयी अम्मा! ये लडका तो.. मेरी जानही लेगा एक दिन.."

तितक्याच आवेशात तिनी ती उशी जोरात फरहानच्या दिशेनी फेकली. पण तो कसला ऐकतोय? त्याने सहज ती पकडली त्याच्या हातात.

शमाला अचानक पाहून त्याला खूप बरं वाटलं.. पण आजकाल तो मुद्दाम तिच्याशी तुटक बोलत होता.. पगली.. तिच्या मनातलं कधीच कळलं होतं त्याला.. आणि तो नव्हता देऊ शकणार तिच्या भावनांना न्याय हेही त्याला माहित होतं. म्हणूनच त्याला नसत्या आशेला तिला लावायचं नव्हतं..

"ए, तू कहाँसे टपकी अभी?"

शमा थोडी खट्टू झाली. पण फारसं मनावर न घेता ती म्हणाली,
"मला तुझा वेळ हवाय.. तुझी अपॉइंटमेन्ट हवीये.. सुनो, ईद आ रही है.. माझ्याबरोबर शॉपिंगला येशील?"

झुरळ झटकावं तसं तो म्हणाला, "ह्यॅ.. मी? आणि शॉपिंगला? आणि तेही तुझ्याबरोबर? क्यों? मैं नही आनेवाला.."

"प्लीज फरहान.. एकदा तरी चल ना माझ्याबरोबर.. नेहेमी असंच करतोस.. मुझे बहुत सारी शॉपिंग करनी है.. और तुम और तुम्हारी नयी कार चाहिये मुझे मेरा सामान उठाने केलिये.." खट्याळपणे हसत ती म्हणाली..

तिचा निरागसपणा पाहून तो विरघळला.."ठीक है, कब?"

शमाचा आनंद गगनात मावेना.."खरं ना? नक्की येशील ना माझ्याबरोबर? ओ थँक्स!! .. कल जायेंगे.. दिनभर.. १० बजे आना घर मुझे लेने.."

नाचत नाचतच ती बाहेर पडली.. खुदाने मेरा सुन लिया.. उद्याचा पूर्ण दिवस फरहान तिच्याबरोबर असणार होता.. उद्या ती सांगणारच होती त्याला सगळं.. कसं, केव्हा, कधी?? माहित नाही, पण सांगणार नक्की..
-----------------------------------------------------------------------------------------

त्या रात्री-

रमा फ्लाईटचे सोपस्कार पूर्ण करून एकदाची बसली विमानात. पण तिच्या मनात बेचैनी होती.. परदेशवार्‍या आधी झाल्या होत्या, पण आज मन उगाचच भरून आल्यासारखं वाटत होतं..

फरहानही बेचैन होता. आज झालेली रमाबरोबरची भेट, आणि उद्या काय घडणार आहे याची चिंता.. प्रयत्न करूनही त्याला झोप येत नव्हती..

शमा मात्र उद्याची वाट पहात गुलाबी स्वप्नात रमली होती..

5 comments:

पूनम छत्रे said...

लोक्स, मोठ्या धाडसाने हे पोस्ट करतेय.. आशा आहे की तुम्हाला ते आवडेल.. I hope, कथा पुढे सरकवली आहे मी..

Tulip said...

एकदम आवडली. तु लिहिते आहेस वाचलं तेव्हाच माहित होतं मस्त असणार. शिवाय फ़रहानच्या तोंडून पहिल्यांदाच नारायण पेठी मराठी ऐवजी हिंदी/उर्दू बाहेर पडलेलं ऐकून आणि गोखले काकांना लेकीच्या रात्री गायब होण्य़ाबद्दल काळजी वाटलेली पाहून चिकित्सक वाचकांना स्टोरी मधे ऒथेंटिसिटी वगैरे येत असल्याचं समाधानही मिळेल.
इसे कहते है एस्क्पिरियन्स्ड .. नव्हें.. connoisseur story teller. :D

Tulip said...

बाकी सर्किट.. तुझ्या ह्या संगेमर्मर में तराशें हुई जैसी हसीना शमा ला आणल्यावर ष्टोरी लई म्हणजे लईच रोमॆन्टीक होत जाणार असं दिसतय:P (आणारे कुणीतरी शाहरुख खानला नको त्यापेक्षा JA ला त्रिकोणाचा चौथा कोन करायला:))).

Abhijit Bathe said...

पूनम - हे रमा-फरहान प्रकरण जरा कुठच्या कुठे चाललं होतं - त्यात जर तरी लॉजिक आणल्याबद्दल धन्यवाद.

आणि ट्युलिप म्हणतिए ते खरं आहे! फरहान खान या माणसाच्या तोंडुन नारायणपेठी मराठी ऐकणं म्हणजे बाळासाहेब नमाज पढायला बसलेत हे बघण्या इतपत वास्तव वाटत होतं.

दुसरं म्हणजे गोखले काका-काकु म्हणजे आई-बाप यांची फरहान बद्दल काय प्रतिक्रिया असेल याचं रमाला सोयर-सुतक आहे कि नाही याबद्दल आधीच्या पोस्ट्स मध्ये शंका येत होती.

एनीवे - एवढे लोक contribute करताहेत म्हणजे प्रत्येकाचीच तीन पायांची शर्यत असणार आहे, त्यात आंधळी कोशिंबीर आणि लिंबु चमचा add केले तर व्हायचा तो झोल होणारंच.

त्या झोलात logic पाह्यलं कि बरं वाटतं.

सर्किट said...

फ़र्फ़ेक्ट!

शमाला इतक्या प्रेमाने स्टोरीत सामावून घेतलं हे पाहून बरं वाटलं! आणि स्टोरी ही पुढे नेलीस, नाहीतर ते दोघे गाडीतून बाहेरच यायला तयार नव्हते.:)

ट्युलिप च्या पहिल्या कॉमेण्टशी सहमत.

बाठेशी अंशत:च सहमत.. (इतना भी बुरा नही चल रहा था रे!)